बाबालोग.. बाबागाडीत!

चाहूल लागली बाळाची,
गडी लै खुश झाला,
सगळ्यांना सांगत सुटला
कि आपला काम फत्ते झाला!

“का बरं सांगितल्या असतील तिला ,
व्हिटॅमिन डी, आयर्न, फॉलीक ऍसिड च्या गोळ्या?”
प्रश्न त्याला हा पडलाच नाही,
चालतं आपल्याकडे म्हंटलेलं “मला ह्यातलं काही कळत नाही!”

शेवटच्या महिन्यात, तिला लागतात वेध,
आईकडे जाऊन राहायचे.
तोही मनातल्यामनात खुश, आता काही दिवस बॅचलरहूड जगायचे!
त्या महिन्यांमध्ये, खरंतर ती अवघडलेलीच असते,
कधीतरी तासभर भेटायला जाऊन त्याला वाटतं,
त्यांनी त्याची “ड्युटी” पूर्ण केलेली असते.

येतं ते नवचैतन्य ह्या जगात,
प्रचंड आनंद! वाटतो तो बर्फी आणि पेढे
कडेवर घेऊन सांभाळायला मात्र,
टाळाटाळ, कारणं आणि आढेवेढे.

दिसतं गोंडस ते बाळ, अंशच ईश्वराचा,
करतच भरपूर शी आणि शु, नो हिशोब डायपरचा!
हे करायला मात्र त्याला, ना आवड ना वेळ,
तीच करत असते सगळं, त्याचा आपला मोबाईल शी खेळ..

बाळ होतं मोठं, पळतं दुडुदुड जोरात हसून,
तीच धावत असते त्याचा मागे, गडी आपला खुर्चीत बसून.
उठायचं सुचतच नाही भाऊला, जोरात मात्र ओरडतो,
“बघ ग त्याला, माहितीये ना किती धडपडतो!”

कधीमधी आणून देणं, चॉकलेटे आणि खेळणं
हेच काय ते त्याच बापपण
बाळाबरोबर मस्ती झाली कि झोपतो निवांत मग,
तिची आपली जागरणं, तगमग आणि हो, पाठीला रग.

ऐकलेच असतील तुम्ही पण कौतुकाचे शब्द आईसाहेबांचे,
“बाकी सोडा, आमच्या “बाळाला” आधण हि नाही ठेवता येत चहाचे..”
आता ह्या बाळाला बाळ झाल्यावर काय अपेक्षा करायची.
विनंती आहे आयांना, कि पुढची पिढी आपणच बदलायची!

गावात, शहरात, सुशिक्षित, बेशिक्षित, उच्चशिक्षित,
बऱ्याच घरात गोष्टी ह्याच दिसतात.
बाबालोग जणू बाबागाडीच असतात!
आणि “हे असच चालत आलंय” म्हणत बरेच हेच पुढे पोसतात..

सर्वात पहिला बदल, तुमच्याच घरात घडवा,
जबाबदारी असते दोघांची, हाच मंत्र पढवा.
तुम्ही कसे वागता आणि वागवता,
ते, ती किंवा तो इवल्या डोळ्यांनी पाहतच असतात,
एक सक्षम समाज घडवण्यासाठी
फक्त आणि फक्त हे संस्कारच कारणीभूत असतात.

हे संस्कारच कारणीभूत असतात.

घडवाल ना हा बदल?

One Comment on “बाबालोग.. बाबागाडीत!

  1. खूपच सुंदर लिहिलंय….. वास्तव आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *