अँटोनी गौडी आणि सेग्राड फॅमिलीया
आर्किटेक्चर (वास्तू विशारद) क्षेत्रा बद्दल मला नेहमीच एक खास आकर्षण वाटत आलंय.
जसा एखाद्या सुंदर सिनेमाचा खरा visionary हा दिग्दर्शक असतो तसाच एखाद्या भव्य दिव्य इमारती चा किंवा structure चा visionary हा आर्किटेक्ट असतो असं मला वाटतं. खरं म्हंटलं तर आपण ह्या वास्तू विशारद क्षेत्राचे धन्यवाद मानले पाहिजेत कारण निसर्ग पर्यटन सोडलं तर बरेचदा आपले प्रवासाचे निर्णय हे कुठल्या तरी प्रख्यात वास्तू ला भेट द्यायचेच असतात. भारतात म्हणाल तर देशभर असलेली भव्य मंदिरे, आग्र्याचा ताज महाल, वीसपूरचा गोल घुमट, राजस्थान मधील आलिशान राजवाडे.. एवढंच काय आपल्या महाराजांचे किल्ले.. सर्व एक प्रकारच्या रचनाच आहेत ज्यांना कुठल्या ना कुठल्या आर्किटेक्ट नी कधी ना कधी डिझाइन केलंच असणार.
त्यामुळे, सगळ्यात पाहिले ह्या अर्चिटेक्चर क्षेत्राला माझे मनापासून धन्यवाद.
बार्सिलोना – ह्या शहराचा नाव बाकी कशाही पेक्षा तिथे असलेल्या फुटबॉल क्लब मुळे जास्त माहीत होतं. लिओनेल मेस्सी हा जगातील सर्वोत्कृष्ट फ़ुटबाँलपटू ह्याच क्लब कडून खेळतो. माद्रिद हे शहर म्हणजे स्पेनची राजधानी. हे सुद्धा इथे असलेल्या रियल माद्रिद आणि ऍथलेटिको माद्रिद, फुटबॉल क्लबस मुळेच आपल्याला जास्त माहीत असेल. माद्रिद वरून बार्सिलोनाला जायला सर्वात सहज पर्याय म्हणजे रेनफे ही रेल्वे. जवळपास साडेसहाशे किलोमीटरच अंतर ही भन्नाट रेल्वे 3 तासात कापते आणि तुम्ही आजूबाजूला निसर्गानी काढलेली रांगोळी बघत असताना ‘सॅण्ट्स’ ह्या बार्सिलोना मधील स्टेशन वर पोचता सुद्धा. हे स्टेशन यायचा आधीच तुम्हाला उजव्या बाजूला निळ्याशार समुद्राची आणि पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्याची झलक दिसते आणि डावीकडे डोंगर. तेव्हाच ह्या शहराला निसर्गानी तर भरभरून दिलंच असल्याची जाणीव होते.
‘सॅन्ट्स’ मधून बाहेर पडताच स्टेशनच्या आतूनच मेट्रोची अतिशय सोप्पी सुविधा आहे. मला नवीन शहर, नवीन देशात आल्यावर तिथल्या वास्तू, आकर्षणं बघायची ओढ़ तर लागतेच पण तिथल्या लोकांना पण ‘ऑब्सर्व्ह’ करायला आवडतं. बऱ्याच लोकांनी बार्सिलोना फ़ुटबाँल चे tshirts घातलेले पण तेवढ्याच लोकांनी ‘Gaudi ‘ असे लिहिलेले tshirt घातले होते. साहजिकच मला उत्सुकता वाटली की हे ‘Gaudi’ काय प्रकरण आहे बघायला हवा. काढला मोबाईल आणि बोललो ‘हेल्लो गूगल, सर्च गौडी बार्सिलोना !’
अँटोनी गौडी हा स्पेन मधील कॅटोलोनीया मध्ये 25 जून 1852 ला जन्मलेला एक वास्तू विशारद म्हणजे आर्किटेक्ट! हे वाचून मला खरंच नवल वाटलं. काही लोकांनी तर ‘ Barcelona Gaudi’ असं लिहिलेले tshirts सुद्धा घातले होते. हा माणूस 1926 साली एक अपघातात बार्सिलोना मध्ये मरण पावला आणि त्याचं नाव लिहिलेले कपडे इथली लोक अजून घालतात हे बघून ह्या आर्किटेक्ट बद्दल इथल्या लोकांच्या मनात खरंच खूप श्रद्धा असावी असं वाटलं. अजून वाचल्यावर असं समजलं की इथली लोक गौडीला God’s Architect मानतात. म्हणजे देवाचा वास्तू विशारद. आपल्याकडे ते पद विश्वकर्मा ह्या देवाला वेदांमध्ये दिलेले आहे पण गेल्या शतकातील एक माणसाला हे पद लोकांनी स्वतःहून बहाल केलंय. आता मात्र माझी उत्सुकता खरंच ताणली गेली आणि मी ठरवलं की सगळ्यात पहिले गौडीनी डिजाईन केलेलं ‘सेग्राड फॅमिलीया’ हे रोमन कॅथॉलिक चर्च बघायला जायचं.
आता मी भारतातली आणि मुख्य करून गोव्याची बरीच चर्चस बघितली आहेत. त्या मुळे माझ्या डोक्यात एक चर्चची वास्तू काय असते त्याचं एक चित्र किंवा टेम्प्लेट होतं पण सेग्राड फॅमिलीया स्टेशन ( हो, मेट्रोच्या स्टेशन ला ह्या चर्च चा नाव दिलेला आहे..) मधून बाहेर पडतानाच, ह्या चर्च च्या टॉवर्स सूर्याला काही प्रमाणात झाकत होते आणि ते दृश्य बघूनच मला जाणवला की मामला फारच वेगळा आहे..
तुम्ही पहिल्यांदा ह्या चर्च च्या प्रचंड वास्तूवर नजर ठेवता तेव्हा काही वेळ तुम्हाला असा वाटतं की हे परिकथेतला प्रकार आहे. त्याला कारण पण तसंच आहे. ह्या चर्चचं बांधकाम चालू झालंय 1882 साली.! परत वाचा. 1882. एकशे चौतीस वर्ष झाली ह्या चर्चचं काम चालू आहे आणि असं म्हणतात की 2026 मध्ये गौडीच्या शंभराव्या स्मृती दिनाला हे तयार असेल.
थोडक्यात एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग बघायला वर्षाला साधारण तीस लाख लोक जगातल्या कानाकोपऱ्यातून येतात.
खोटा वाटतं ना ऐकायला. पण खरं आहे.
मला आधी माहीत असल्यामुळे माझं आणि अमृताचं प्रवेश तिकिट मी आधीच ऑनलाईन काढून ठेवलं होतं. तेच सगळ्यात सोयीचं आहे कारण तुम्ही परस्पर गेलात तर बरेचदा त्या दिवसाचे प्रवेश संपले असतील तर तुम्हाला आत सोडणार नाहीत. बांधकाम अजून चालू असल्या कारणामुळे ही योग्य पद्धत अवलंबलेली दिसतीये. ह्या मंदिरमध्ये (स्पेन मध्ये ह्या वास्तूला Temple of Sagrada Família असंच म्हणतात म्हणून मी पण मंदिर हा शब्द वापरला आहे) प्रवेश करायच्या आधी मान वरती करून त्या भव्य अश्या टॉवर्स ज्याला स्पायर्स ( Spires ) म्हणतात त्यांना पूर्ण बघायचा प्रयत्न चालू होता. नजरेत भरत नाहीत म्हणून मान वरती करून थकलो होतो आणि मन्दिराच्या परिसरात आल्यावर नजर खाली करून ह्या वास्तू च्या भिंतीवर काय कोरलंय ते बघायला लागलो.. प्रवेश शुल्कामध्ये तुम्हाला एक ऑडिओ गाईड यंत्र मिळतं जे तुम्हाला सगळी माहिती सांगतं. प्रवेश होतो त्या मंदिराच्या बाजूला Passion Facade असे म्हणतात. Facade म्हणजे बाह्य भिंत. मंदिराला तीन बाह्य भिंती आहेत. त्यांची नावं त्या भिंतीवर काय कोरलं आहे किंवा कोरलं जाणारे त्यावरून ठेवली आहेत, गौडी साहेबांनी!
तर Passion Facade वर येशू ख्रिस्ताच्या आयुष्यातील संघर्ष, त्याचा झालेला मृत्यू आणि त्यानंतर झालेलं पुनरुत्थान ह्याची गोष्ट कोरली आहे. काही अंशी मंदिराची ही बाह्य बाजू आपल्याला आयुष्यातील संघर्ष आणि दुःख ह्या आपल्याला कितीही नकोश्या असलेल्या सत्याची जाणीव करून देतात. एक नजर टाकली तरी कळतं की गौडीनी शंभर-दीडशे वर्षांपूर्वी बनवलेलं हे डिजाईन काहीसं ताणलेल्या स्नायू आणि त्या वरील कॉलम्स हे बरगड्या सारखे वाटतात. इथे येशूच्या आयुष्यातील शेवटच्या घटना आणि सहन केलेला अत्याचार अतिशय कल्पक शिल्पांद्वारे मांडला आहे. शिल्पांच्या चेहऱ्यावरील भाव लगेच लक्षात येतात. एका शिल्पाचा चेहरा गौडी सारखा आहे आणि माझ्या ऑडिओ गाईडनी मला सांगितलं कि कॅटालिअन शिल्पकार ‘जोसेफ मारिया सुबीराच’ ह्यांनी गौडीला दिलेली ती आदरांजली आहे. कमाल ना..
दुसरी तयार असलेली बाह्य बाजू म्हणजे ‘Nativity facade ‘. वरती सांगितलेला पॅशन फसाद हा आत्ता तयार होतोय पण नेटिव्हिटी फसाद मात्र गौडी होते तेव्हाच तयार झालेलं आहे आणि त्या मुळे त्यांचा आणि त्या वेळचा खूप जास्त प्रभाव इथे दिसतो. नेटिव्हिटी म्हणजे जन्म. साहजिकच येशूच्या जन्माची कहाणी ह्या प्रचंड मोठ्या कॅनव्हास वर गौडीनी आणि त्या वेळच्या शिल्पकारांनी सुंदर पद्धतींनी मांडली आहे. येशू जन्मला तेव्हा आकाशात चमकलेला तारा आणि त्यातून आलेली किरणं जी बाळ अवस्थेतल्या येशू वर पडतात हे शिल्पाद्वारे सुंदर पद्धतींनी मांडलं आहे. नेटिव्हिटी फसाद मध्ये येशू च्या जन्मामुळे झालेलं आनंद शिल्पांच्या चेहऱ्यावर तसंच प्राणी, पक्षी, झाडं आकाशातील तारे – सर्वांवरच दिसतो. हे आनंदानी भरपूर असलेलं फसाद आणि पॅशन फसाद ज्या मध्ये आयुष्यातला भकासपणा किंवा दुःख मांडलंय – दोन्ही मधील फरक एक क्षणात लक्षात येतो.
हे दोन फसाद आत्ता तयार आहेत आणि मजा म्हणजे जिथून प्रवेश असणार आहे तो फसाद म्हणजे ग्लोरी फसाद – तो अजून बनतोय. ह्या वर येशू चा प्रेम, शांती, दातृत्व चा संदेश असणार आहे. ह्या फसाद मध्ये मुख्य दरवाजा असणार आहे ज्या वर जग भरातील वेगवेगळ्या 50 भाषांमध्ये ‘आम्हाला द्या परमेश्वरा, आमची रोजची भाकर’ हा संदेश कोरलं असणार आहे – ह्या 50 भाषा मध्ये संस्कृत एक आहे हे इथे नमूद करण्या जोगे..
ह्या फोटो मध्ये संस्कृत कुठे दिसते ते शोध आता 🙂
मंदिराच्या बाह्य सुंदरतेमुळे काहीसा झिंगलो होतो. एवढा मोठ्या प्रमाणावर चालू असलेलं काम ते सुद्धा गेले 134 वर्षं.. अजब वाटत होतं आणि असे काही विचार चालू असतानाच मी आणि अमृता दरवाजातून आत आलो. समोरचा दृश्य बघून खरंतर काय प्रतिक्रिया द्यायची हे कळत नव्हतं.
माहिती ऐकत होतो त्यावरून कळलं की गौडी साहेबांना ह्या मंदिराला एक जंगलाच्या स्वरूपात बांधायचं होतं. म्हणून जे मोठेच्या मोठे कॉलम्स होते ते एक प्रचंड मोठ्या झाडाच्या बुंध्यासारखे डिजाईन केले आहेत. वेगळे वेगळी झाडं ती पण वेग वेगळ्या आकाराची असं भासवायचं असल्या कारणानी वेगवेगळ्या कॉलम्ससाठी वेगवेगळं मटेरिअल! त्यामुळे कॉलम्सचा रंग पण वेगळा आहे. बरं हे कॉलम्स नुसतेच एकसंध नाहीत तर जश्या बुंध्याला फांद्या फुटतात तश्या ह्या कॉलम्सला पण चार फांद्या फुटतात.. आणि वरती सिलिंगला ह्या सगळ्या फांद्या वरती असणारी पानं फळ फुलं.. बरं अजून जंगलाचा भास करून देण्यासाठी नैसर्गिक प्रकाशाचा अफलातून खेळ गौडी नी साधला आहे. टेन्टेड काचा वापरून मंदिराच्या आत जी काही नैसर्गिक विविधरंगी प्रकाशाची रांगोळी साधली आहे त्याला खरंच शब्द अपुरे पडतात. खाली काही फोटो देत आहेच पण एकंच सांगतो – जिथे येशू चा पुतळा आहे, म्हणजे आपल्या हिंदू भाषेत जिथे गाभारा किंवा मुख्य दैवत येणार तिथे गौडी साहेबाना जंगलातील सकाळचा धुकं कसं दिसतं ते दाखवायचं होतं. टेन्टेड ग्लास वापरून त्यांनी जंगलातील धुकं इतकं बेमालूम पणे खरं केलंय की मी आणि अमृता नी 2-3 वेळा डोळे चोळून पाहिले.. मग कळलं की धुक्याचा इफेक्ट आहे.
आर्किटेक्चर च्या दृष्टींनी तर बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत ज्या ह्या क्षेत्रातील लोकांना भावतील पण माझ्या अल्प बुद्दीला सुद्धा आश्चर्य वाटलं की ह्या माणसानी 134 वर्षांपूर्वी डिजाईन केलेली वास्तू लोक अजून बनवतायत. ज्या काळी क्रेन वगरे काही प्रकार नव्हते किंवा आज काल सारखे संगणक नव्हते, कॉलम्स किंवा दगडाला आकार देणारी स्वयंचलित यंत्र नव्हती किंवा एक क्लिक वर ब्लूप्रिंट्स बनवणारी सॉफ्टवेअर्स नव्हती. त्या वेळी गौडीनी काय विचार करून एवढ्या भव्य दिव्य मंदिराची योजना मांडली असेल! इथले लोक सांगतात की गौडी ला पूर्ण कल्पना होती की हे त्याच्या हयातीत होणार नाहीये म्हणून त्यांनी अनेक वर्षं त्याच्या डिजाईनच्या प्रतिकृती बनवण्यात घालवली. अजूनही हे बांधकाम गौडीनी दिलेल्या सूचना, बनवलेल्या प्रतिकृती आणि काढलेल्या डिजाईन ला अनुसरून चालू आहे आणि ते साध्य करायला अतिशय आधुनिक अश्या एरॉनॉटिकल आणि कार डिजाईन करणारी प्रणाली वापरल्या जातायत! मजा म्हणजे एवढी आधुनिक साधना वापरल्या नंतर जेव्हा बांधकाम होता आणि लक्षात येत की गौडी नी दिलेल्या सूचना मध्ये एक मिलीमीटर ची ही गफलत नसते.. तेव्हा फक्त तुम्ही गौडी च्या अलौकिक बुद्धिमत्तेला सलाम करता..
गौडी जिवंत असताना त्याला विचारण्यात आला होता की जे उंचच्या उंच टॉवर्स आहेत त्यांच्या कळसावरील नक्षी पण अगदी सूक्ष्म तपशीलवार झाली पाहिजे असं कशाला..कोण एवढा उंच जाऊन बघणार आहे. त्याला गौडीचा उत्तर असं होता की स्वर्गातील देव देवता बघत असतील!
एखादी मोकळी जागा बघून त्या जागे मध्ये अशी एखादी कलाकृती जी परमेश्वराला अर्पण असेल, इतक्या मोठ्या प्रमाणाची आणि तरी पण इतकी काही सुंदर..
खरंच कळतं की कॅटॅलेनिया , बार्सिलोना चे लोकं का ह्या माणसाला ‘ देवाचा आर्किटेक्ट’ म्हणतं आणि अजूनही त्याचा गरूड इथल्या सामान्य जनतेच्या मनावर का आहे..
ह्या चर्चच्या आत गाभाऱयाखालीच गौडीला दफन केले आहे. 10 जून 1926 ला मरण पावलेल्या अँटोनी गौडीनी 73 वर्षातल्या आयुष्यामधील 43 वर्षं ह्या मंदिरावर अर्पण केली आणि तिथेच त्याला शेवटची आणि कायमची आरामाची जागा दिली गेली आहे. मला वाटतं की आजकाल आपण सगळ्याच बाबतीत खूप घाई करतो. सर्व गोष्टी आता स्मार्टफोन्स मुळे बोटाच्या टोकांवर आल्या आहेत. मला अजिबात उगाच नाहीत्या गोष्टीबद्दल कुरबुर करायला आवडत नाही पण कधी कधी वाटतंय की ह्या ‘खूप’ सारं करायचा नादात आपण सगळंच ‘थोडं थोडं’ करतोय आणि काहीतरी मोठ्ठं किंवा संस्मरणीय वगेरे प्रकारात मोडण्याऱ्या गोष्टी आपल्या हातून काही होत नाहीयेत. असो.
सेग्राड फॅमिलीया गेले 134 वर्षं बनत आहे, अजून 10 वर्षं लागतील बनायला पण काटोलेनिया चे लोकं ‘घाई’ काही करत नाहीयेत. गौडी ला जेव्हा विचारला होता की एवढी वर्षं लागणार हे बरोबर आहे का तेव्हा मार्मिकपणे अँटोनी उत्तरला होता की ‘माझ्या क्लायंट ला काही घाई नाही आहे!’
ह्या गाभार्याच्या मागे जिथे गौडी ला दफन केलाय तिथेच वरती छोटीशी जागा केलीये जिथे तुम्हीच प्रार्थना करू शकता. बांधकाम चालू आहे त्यामुळे येणारे लोक प्रार्थना करायला फारसे येत नाहीत त्या मुळे तिथे 2–3 च लोक होती. मी आत जाऊ शकतो असा तिथे उभ्या असलेल्या स्वयंसेविकेला विचारल्यावर ती जरा प्रश्नार्थक नजरेनेच ठीके म्हणाली.
आत येऊन बसलो. समोर येशूची छोटेखानी मूर्ती होती. तिला नमस्कार केला आणि डोळे बंद केले तर जाणवलं की हजारो लोक गाभार्याच्या पलीकडे आहेत पण इथे जरा वेगळीच शांतता आहे. त्यांचा गोंगाट आहे पण त्याला पण एक लय प्राप्त झालीये. गेले 3-4 तास अनुभवलेल्या ह्या अचाट मानवी इच्छेच्या पराक्रमाला आणि त्यामागील ऊर्जा असणाऱ्या परमेश्वराला आठवून डोळ्यांच्या आतले डोळे पण मिटले आणि मनातल्या मनात ‘श्री गणेशाय नमः. अस्य श्रीराम रक्षा स्तोत्रं..’ म्हणायला लागलो. निवांत रामरक्षा म्हंटली.माझी श्रद्धा आहे की परमेश्वर हा मनःशांती मिळवून देण्याचा मार्ग आहे. मग तो मार्ग नाशिकच्या काळ्या राम मंदिरातून असो, पुण्याच्या सारसबागेतून असो, मुंबईच्या हाजी आली मधून असो, कोपेनहेगेन मध्ये मी अधून मधून जातो त्या गुरुद्वारा मधून असो.. किंवा बार्सिलोना मधल्या ह्या सेग्राड फॅमिलीया मधून असो.. डोळे उघडून येशू कडे बघितलं तेव्हा ते हसून सांगत होते, “काळजी करू नकोस, श्रीराम माझे मित्रच आहेत. त्यांचा कडून समजावून घेईन मी श्रीरामरक्षेचा अर्थ.” हा विचार माझ्या डोक्यातलाच होता पण तरी किंचित हसू आलंच.
प्रार्थना करून उठलो आणि सेग्राड फॅमिलीया मधून बाहेर पडलो. मागे वळून बघायचा मोह आवरला नाही म्हणून परत एकदा त्या महावास्तू वर नजर भिडवली. जेव्हा ही पूर्ण होईल तेव्हा ह्याची उंची 170 मीटर असणार आहे. जरा तुलना करायची झाली तर ताजमहाल हा 70 मीटर उंच आहे.. म्हणजे जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा साधारण ताज महालच्या अडीच पट उंच असेल. आता ही उंची 170 मीटरच का तर बार्सिलोनाला लागून एक मॉन्ट जूस नावाचा डोंगर आहे. त्याची उंची आहे 171 मीटर.
देवाच्या निर्मिती पेक्षा उंच बांधायचं नाही असं अतिशय प्रगल्भ कारण अँटोनी गौडीनी दिलंय.
अश्या विचारांच्या आणि ह्या निर्मितीच्या द्रष्टा गौडीला तर सलाम आहेच..
पण 134 वर्ष झाली तरी त्याचं जिद्दीने आणि श्रद्धेने आजही हे मंदिर बांधत असणाऱ्या आर्किटेक्टस आणि त्यांचा बरोबर काम करणाऱ्या सर्वांना सलाम.
2026 साली बांधून होणार म्हणत्यात..
मी आणि अमृतानी तर तेव्हाच ठरवलंय की उदघाटनाला यायचंच.
येशू ची पण फर्माईश आहे, उदघाटनाला रामरक्षा ऐकायची.
आता यावंच लागणार. 🙂
I have been studing Gaudi and his works a lot. But i have never come across anyone describing Sagrada Família so well and being able to notice the little details which Gaudi worked so hard for. After reading, i am completely overwhelmed. Even if i have never visited the building, i could experience the whole space with your words. Thank you so much for such great experience!
I must say that you wuld be able to appreciate much more minute details being an architect! Thanks a lot. 🙂
सुंदर लिहिले आहेस मित्रा !
वर्णन आणि त्याला संदर्भांची साथ. वाचताना मजा आली.
फोटोस पण मस्त आहेत.नवीन गोष्टी समजल्या
लिहीत रहा
धन्यवाद!. फोटोस सगळे मी नाही काढलेले. काही त्यांचा ऑफिशिअल एफबी पेज वरून घेतले.
खूप छान माहीती दिलीस शंतनु.अभुतपुर्व अशी ही सत्य घटना घडत असल्याचे वाचुन कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. तू
नेहमीच असे भव्य दिव्य लिहित असतोस
वाचू न मन भरून येते.अशीच आमच्या ज्ञानात भर पाडत रहा ही विनंती
वाह! तुम्ही केलेला कौतुक विशेष आवडल काका. खरं तर लिखाण फार शिस्तीचा काम आहे आणि मी खूप जास्त आळशी आहे. नियमित लिहायचा नक्की प्रयत्न करीन.
Khup chan . Tuzya mule navin mahiti milali . Thanks
धन्यवाद. पुढची ट्रीप स्पेन ला करून टाका 🙂